वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल
संगमेश्वर: तालुक्यात शुक्रवारी दुपारी अचानक 3 वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले आणि अचानक विजांच्या कडकडाटासह धुवाँधार पाऊस झाला. पावसासोबत चक्रीवादळाने तडाखा दिल्याने अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली.
या घटनेमुळे भातशेतीही जमीनदोस्त झाली. यात केळीची झाडे, फूलझाडे, झेंंडूची शेती जमीनदोस्त झाली आहे.
अनेक ठिकाणी झाडे पडल्याने सुमारे 3 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. माखजन परिसरात साग, काजू तसेच आंब्याची नवीन लागवड केलेली रोपे वार्याच्या मार्यामुळे कोसळली. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी छपरावरील पत्रेही उडून गेले. अनेक ठिकाणी पावसाची उघडीप असल्याने भातपिक कापून ठेवण्यात आले होते. परंतु पावसामुळे भातशेती पाण्यात तरंगू लागली आहे तर उभी शेती पूर्णपणे आडवी झाली आहे.