रत्नागिरी : किनापट्टीवर किंवा समुद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मच्छीमार सहकारी संस्था, नौका मालक, तांडेल, खलाशी आदींची नोंद पोलिसांनी ठेवली आहे. मच्छीमारी व्यवसायातील साडेसहा हजार लोकांची कुंडली जिल्हा पोलिस दलाकडे आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेवर पोलिसांची चांगली पकड असल्याचे दिसून येत आहे.
देवगड येथे खलाशाने तांडेलाचे शिर कापून खून केला. त्यानंतर मासेमारी नौकेलाही आग लावली. या भयानक प्रकरणानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. याबाबत जिल्हा पोलिस दलाकडे माहिती घेतली असता पोलिस दल सतर्क असल्याचे दिसले. कोकण सागरी किनारपट्टी अधिक संवेदनशील आहे. १९९५ पूर्वीपासून किनारपट्टीचा तस्करीसाठी वापर होत होता. त्यानंतर किनारपट्टीवर स्फोटके देखील उतरविण्यात आली होती.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी देखील किनारी भागातूनच घुसखोरी केली. अलिकडेच अमली पदार्थांची पॅकेट संपूर्ण किनारपट्टीवर सापडत होती. त्यामुळे किनारी भागात पोलिसांनी मच्छीमारांसह सागरी सुरक्षा दलांनाही सतर्क राण्याच्या सूचना केल्या; परंतु सागरी किनाऱ्याची खरी भिस्त आहे ती मच्छीमारांवरच. किनारपट्टी आणि खोल सागराशी मच्छीमारांचा नेहमी संबंध येतो. त्यामुळे अंतर्गत हालचालीचीही सर्वांत पहिली माहिती त्यांना मिळते. सागरी सुरक्षा अधिक मजबूत व्हावी, यासाठी पोलिसांनी किनारी भागात मासेमारी करणाऱ्या नौका मालक, तांडेल, खलाशी आदींची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जिल्ह्याच्या किनारी भागातील साडेसहा हजार मच्छीमारांची फोटोसह संपूर्ण माहिती संकलित केली आहे. त्यामुळे कोणताही गुन्हा घडल्यास त्याची उकल करण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या संकलित केलेल्या माहितीबाबत दुजोरा दिला.