मुंबई:- मुंबईवर झालेल्या ’26/11′ च्या हल्ल्यात कामा रुग्णालयात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या पाच नातेवाईकांची प्रतीक्षा 16 वर्षांनंतर संपली असून त्यांना नुकतीच कामा रुग्णालयात हक्काची नोकरी मिळाली आहे.
त्यामुळे हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांनाही आधार मिळाला आहे. यामध्ये नीता कणबी, भावना गिलातर, ज्योती सालंकी, शेखर दिवेकर आणि विक्रम उघडे यांना नोकरी मिळाल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालव यांनी दिली.
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शेकडो निष्पापांचे बळी गेले. रेल्वे स्थानकावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दहशतवादी अजमल कसाबसह काही अतिरेकी जवळच्याच कामा रुग्णालयात घुसले. त्यांनी सुरक्षा रक्षकांकडून पिण्यासाठी पाणीदेखील घेतले, मात्र त्यानंतर सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करीत त्याची हत्याही केली. यानंतर त्यांनी आपला मोर्चा रुग्णालकाकडे वळवला. यावेळी कामा रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणारे बबन बाळू उघडे अजमल कसाबच्या हल्ल्यात शहीद झाले. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले उघडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्तापुरुष गेल्याने कुटुंबीयांवर उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न सतावू लागला, परंतु राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारच्या या आश्वासनानंतर बबन बाळू उघडे यांचे मोठे पुत्र विलास उघडे यांनी नोकरीसाठी अर्ज केला आणि ते सेवेत रुजू झाले, मात्र 2013 मध्ये दीर्घ आजारामुळे विलास उघडे यांचेही निधन झाले. त्यानंतर विठ्ठल उघडे यांनी नोकरीसाठी अर्ज केला.
– विठ्ठल उघडे यांची फाईल सरकारी कार्यालयात धूळ खात पडून होती. मात्र कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालव यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला आणि विठ्ठल उघडे यांना अखेर कामा रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी लागली. तुषार पालव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नोकरी लागल्याने उघडे यांच्या कुटुंबीयांनी पालव यांचे आभार मानले. आचारसंहिता लागण्यापूर्वी अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. उघडे यांच्यासह चौघा मृतांच्या नातेवाईकांना नोकरी देण्यात आली.