सुरेश दसम / कोंडये
संगमेश्वर खाडीपट्ट्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांच्या सुरात सूर मिसळून गडगडाट व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या धुवांधार पावसाने कोंड्ये, डिंगणी, पिरंदवणे परिसराला चांगलाच तडाखा दिला. या जोरदार पावसाने वीज खांब कोसळून खाडीपट्टा सायंकाळपासून अंधारात गेला आहे.
गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने खाडी पट्ट्यातील कोंड्ये, डिंगणी, पिरंदवणे, फुनगुस परिसराला जोरदार दणका दिला. जोरदार वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक वीज खांब कोसळून पडले आहेत. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून विजखांबावर पडली आहेत. सायंकाळनंतर घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरीक अंधारात चाचपडत आहेत. अंधारात त्यांना रात्र काढावी लागणार आहे. वीज खांब पडलेल्या ठिकाणी ग्रामस्थ बॅटरीच्या प्रकाशाने झाडे तोडण्याची कामे करत आहेत. वीज पुरवठा लवकर सुरू व्हावा यासाठी ग्रामस्थांनी महावितरणला सहकार्य करण्याचे दर्शवले आहे. याबाबत महावितरणला कळवल्यानंतर तत्परता दर्शवत महावितरणचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. त्यांनी त्वरित कामाला सुरुवात केली. मात्र काळोख झाल्यामुळे काम करण्यात अडचणी येत होत्या. उद्यापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. असे असले तरी ग्रामस्थांना मुलाबाळासह दिवाळीची पहिली प्रकाशमान रात्र अंधारात काढावी लागणार आहे.