अफवांवर विश्वास ठेवू नका : अंनिसचे आवाहन
रत्नागिरी/विशेष प्रतिनिधी :- तालुक्यातील उक्षी-वांद्री पुलावर रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना भुताटकी दिसत असल्याचे बोलले जात आहे. गेले काही दिवस हे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहन चालक सांगतात की, एका बाईचे भूत दिसते, त्याच्यापुढे काही अंतरावरच मुंडक नसलेली बाई गाडीच्या पुढे आडवी येते आणि अचानकपणे बाईच्या रडण्याचा आवाज येतो, असे ते एकमेकांना सांगत आहेत. भुताटकी आहे हे अस सांगताना काळोखात उभी असलेली स्त्री आणि गाडीच्या प्रकाशात पुढे चालणारी साडीच्या वेशातील स्त्रीचे फोटोही दाखवले जात आहेत. एवढच नव्हे तर या भुताटकीचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामुळे परिसरात आता हीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाताना वाहन चालक घाबरत आहेत.
रात्रीच्या वेळेस उक्षी-करबुडे रत्नागिरी या मार्गावरून अनेक प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या रस्त्याबाबत आता अफवा पसरवली जात आहे. याचा तपास आणि या मागची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न ग्रामीण वार्ताने केला मात्र सोशल मीडिया वरती जे काही फोटो व्हायरल होत आहेत हे फोटो गेली अनेक वर्षांपासून व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याचबरोबर हे फोटो आपल्या रत्नागिरी तालुक्यातल्या उक्षी वांद्री करबुडे परिसरातले नसून अन्य ठिकाणचे आहेत. असे निदर्शनास आले आहे. भुताटकी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामीण वार्ताने अंनिसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.रवी खानविलकर यांच्याशी संपर्क साधला असता श्री.रवी खानविलकर यांनी सांगितले की
‘अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि विश्वास ठेवू नये.भूत,प्रेत, भुताटकी हा प्रकार मुळात अस्तित्वातच नाही. ही फक्त माणसांची एक मानसिकता आहे. कोकणामध्ये आज ही अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पाळली जाते. आजचे विज्ञानाचे युग आहे. कोणतीही बातमी किंवा फोटो सहज सोशल मीडियावर व्हायरल होतात. हे फोटो आपण पुढे सेंड करत असता, त्याची आपण स्वतःहून खातर जमा केली पाहिजे. खोटी अंधश्रद्धा किंवा जादूटोणा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये प्रारीत झाला आहे. याची शिक्षा दोष सिद्ध झाल्यानंतर ६ महिने ते ७ वर्ष कैद आणि ५००० रुपये ते ५०००० रुपयाची शिक्षा होऊ शकते.
श्री.रवी खानविलकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष,अंनिस
त्याचबरोबर ग्रामीण वार्ताने उक्षी गावचे पोलिस पाटील श्री. अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, अशा कोणत्याही घटना या परिसरात नाहीत. तसेच नागरिकात भीती निर्माण होईल अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करू नये. आणि अशा कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. या मार्गावरून बिंदास प्रवास करावा. काही अडचण आल्यास ग्रामस्थांशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर ग्रामीण वार्ता ने व्हायरल होणारे फोटो इंटरनेटवर फॅक्ट चेक केले असता हेच फोटो अनेक राज्यात भूत दिसल्याचे म्हणून व्हायरल झालेले आहेत. शेवटी यात काहीही तथ्य नाही असे समजते.
ग्रामीण वार्ता तर्फे आवाहन करण्यात येत आहे की अश्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि कोणतीही खातरजमा न करता फोटो व्हायरल करू नयेत