मुंबई:-बाळासाहेब आणि त्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे हे कधीही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. मात्र तिसऱ्या पिढीतील आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या पदार्पणानंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित माहिम विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.
राज ठाकरेंनी भाजप व शिंदे गटाला स्पष्ट इशारा दिला आहे की, माहिममध्ये कोण उमेदवार द्यायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे, मात्र मनसेचा उमेदवार मैदानात असेलच. राज ठाकरेंनी स्पष्टपणे त्यांचा ठाकरी बाणा पुन्हा दाखवला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना त्यांनी कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला. ‘राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी थेट मार्ग आवश्यक असतो; तिरकी चाल फार काळ टिकत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. यामुळे ठाकरे कुटुंब आणि शिंदे-फडणवीस यांच्या राजकीय संघर्षात आणखी रंगत येणार आहे.
माहिम मतदारसंघात मनसेच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे सध्याचे आमदार सदा सरवणकर यांना माघार घेण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र तरीही सरवणकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे माहिममध्ये भाजप-शिवसेना आणि मनसे यांच्यात थेट संघर्ष दिसून येईल. ही निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे तर भाजप आणि शिंदे गटासाठीही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.