दापोली:- दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाला मोठा धक्का बसला असून अनंद पांडूरंग जाधव यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता दापोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या 11 वरून 10 झाली आहे.
4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे 4 तारखेपर्यंत कोण कोण विधानसभेच्या रिंगणातून बाहेर पडणार याची प्रतिक्षा दापोली मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील दापोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात दापोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा दापोली तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी प्राधिकृत केलेले त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 11 उमेदवारांच्या 14 प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. यामध्ये अनंत पांडुरंग जाधव यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रात आवश्यक असलेल्या 10 सुचकांची नावे नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविले. त्यामुळे आता दापोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या एकुण 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.