प्रथमेश गावणकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर निर्णय
रत्नागिरी:-जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी ऍड.महेंद्र मांडवकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. येत्या काळात जिजाऊ संस्थेचे काम जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर अधिक वेगाने सुरु राहिल व भविष्यात आवश्यकता भासल्यास लोकांना राजकीय पर्याय म्हणून देखील काम करेल, असा विश्वास ऍड. मांडवकर यांनी व्यक्त केला आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची महाराष्ट्रात सन 2008 पासून पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिह्यांमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरु आहे. पण या संस्थेचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रथमेश गावणकर यांनी नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात मंगळवारी प्रवेश केला. त्यामुळे संस्थेच्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची उणीव तातडीने भरून काढण्यासाठी संस्थापक सांबरे यांनी ऍड. मांडवकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी सोपवली आहे. मांडवकर हे काही वर्षापासून रत्नागिरीत एक नामांकित वकील म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वकिली क्षेत्रातही आतापर्यंत अनेकवेळा सामाजिक बांधिलकी ते जपत आले आहेत. ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सल्लागारही होते.
जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्याची रत्नागिरीत बुधवारी तातडीने बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी तालुका अध्यक्ष मंदार नैकर, रत्नागिरी, युवक तालुका अध्यक्ष, अक्षय बारगुडे,लाजुळ, दीपक सांबरे, धामणसे, सिध्देश रांबाडे, वेतोशी, संजय कुवार, मांजरे, शशिकांत म्हादये,मेर्वी,नंदकुमार डाफळे, धामणसे, सागर कळंबटे, मिरजोळे, तुकाराम पाष्ठे, वेतोशो, साईराज कोलते, पाचल राजापूर, साहील गोरे, पाली, चेतन शितप, लाजुळ, सिध्देश चिंदाने, पावस, प्रकाश गोताड, खालगाव, मंदार मांडवकर, कोळंबे हे उपस्थित होते.
‘जिजाऊच्या सामाजिक व राजकीय वाटचालीमुळे नेहमी प्रेरित होत संस्थापक नीलेश सांबरे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवेन. त्याला कुठेही तडा जाऊ न देता जिजाऊचे काम सर्व सहकाऱ्याना सोबत घेऊन तळागाळात पोहोचवण्याचे ध्येय आहे. तसेच जिजाऊ ही एक विचारधारा आहे, ती कधीही संपणार नाही, असे ऍड. मांडवकर यांनी सांगितले.