रत्नागिरीतील जेष्ठ नागरिकांचे प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यालगत पडलेली खडी, वाळूचे ढिगारे यामुळे वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालवून ज्येष्ठ नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. 26 ऑक्टोबर रोजी दत्तप्रसाद वासुदेव गोडसे या ज्येष्ठ नागरिकाचा सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकीमुळे अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नागिरी येथील ज्येष्ठ नागरिकांनी 29 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदने देऊन शहरातील वाढत्या रस्ते अपघाताबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
रत्नागिरी नगर परिषद महसूल विभाग आरटीओ कार्यालय आणि पोलीस खात्याने रस्ते अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ अमलात आणाव्यात अशी मागणी जेष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यालगत साठवलेले वाळू आणि खडीचे ढीग यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच सुसाट वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहन चालकावर पोलीस वाहतूक विभाग आणि आरटीओ कार्यालय यांनी कायदेशीर कारवाई करून अपघात नियंत्रण उपायोजना अमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हास्तरावर रस्ते सुरक्षा समिती शासनाने निर्माण केलेली आहे. या समितीने याचा गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी जेष्ठ नागरिक संघातर्फे . सुरेश विष्णू उर्फ अण्णा लिमये आणि समाजभूषण . सुरेंद्र घुडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळात सर्वश्री दिलीप कुमार साळवी शरद विलणकर, lदत्ताराम लिंगायत, अरविंद वांदरकर, अनिल सुर्वे, श्रीमती अपर्णा कोचरेकर, श्रीमती स्नेहल कुंभवडेकर इत्यादी ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत तेथील संबंधित अधिकाऱ्याने निवेदनांचा स्वीकार करून ज्येष्ठांच्या सूचनेचा गंभीरपणे विचार करण्याचे यावेळी आश्वासन दिले.