2 तासानंतर गाडी मार्गस्थ
रत्नागिरी : कोकण मार्गावरून धावणाऱ्या मडगाव- सीएसएमटी मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आडवलीनजीक बिघाड झाला. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुसऱ्या गाडीचे इंजिन जोडल्यानंतर दोन तासानंतर एक्सप्रेस मार्गस्थ झाली. पनवेल सावंतवाडी स्पेशलही चार तास उशिराने धावली. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागला. त्यामुळे दीपावली निमित्त गावी येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
12052 क्रमांकाची मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस आडवलीनजीक आली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लोकोपायलटच्या निदर्शनास येतात एक्सप्रेसला थांबा देण्यात आला.
याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना कळवल्यानंतर एक्सप्रेस मार्गस्थ करण्यासाठी दुसरे इंजिन जोडण्याची धावपळ सुरू झाली. दुसरे इंजिन येईपर्यंत जनशताब्दी एक्सप्रेसचे प्रवासी दोन तास आडवलीनजीकच रखडले. 10105 क्रमांकाची दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस दोन तास उशिराने रवाना झाली. निजामुद्दीन- एर्णाकुलम मंगला एक्सप्रेसही एक तास विलंबाने धावली. मडगाव- सीएसएमटी तेजस एक्सप्रेसही 1 तास 25 मिनिटे उशिराने धावल्याने प्रवासी खोळंबले. अन्य तीन रेल्वेगाडयाही उशिराने रवाना झाल्याने प्रवाशांना विस्कळीत वेळापत्रकाचा फटका बसला.