दापोली:-दापोली बस स्थानकासमोर क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी 1.15 वाजण्याया सुमारास घडली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद अमरदीप अशोक कासारे (35, जालगाव, बर्वेआळी) यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. या फिर्यादीनुसार अमरदीप कासारे याचे वडील अशोक कासारे यांनी मंगळवारी जगदीश तांबे यांच्याकडे उसने दिलेल्या पैशांची मागणी केली. याचा राग आल्याने जगदीश तांबे यांनी अमरदीप कासारे हे कारमधून जालगाव येथून दापोलीकडे येत असताना बसस्थानकासमोर त्यांच्या गाडीसमोर आपली दुचाकी आडवी लावून कासारे यांचा रस्ता अडवला व त्यांना शिवीगाळ करू लागले.
अमरदीप कासारे यांनी याबाबत त्यांना विचारणा केली असता जगदीश तांबे यांनी कासारे यांचा टी-शर्ट पकडून हाताच्या ठोशाने मारहाण केली. तसेच कासारे यांना ठार मारण्याची धमकी दिली. कासारे यांच्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 126 (2) 115 (2) 324 (2) 35 2, 351(2) प्रमाणे जगदीश तांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.