रत्नागिरी : रत्नागिरीतील एका तरुणाला 51 लाख रुपयांची बंपर लॉटरी बक्षीस लागले आहे. या तरुणाने रत्नागिरी येथील स्टँडच्या बाजूला असलेल्या लॉटरी सेंटरवरून लॉटरी काढली होती. महाराष्ट्र दसरा बंपर लॉटरीच्या माध्यमातून ही लॉटरी बक्षीस मिळाले आहे. एवढे मोठया रकमेचे बक्षीस लागल्याने या इसमाचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र ती व्यक्ती कोण त्याचे नाव समजू शकले नाही. संबंधित तरुणाने रत्नागिरीतील एका केंद्रावर महाराष्ट्र बंपर दसराचे तिकीट खरेदी केले होते. नुकतीच या बंपर लॉटरीची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये या तरुणाने खरेदी केलेले तिकीट क्रमांक 7027 डीबी 08 या क्रमांकाला सुमारे 51 लाख रुपयांचे लॉटरी तिकीट लागल्याचे समोर आले.
लॉटरी केंद्र मालकाने आपल्याच ग्राहकाला हे बक्षीस लागल्याचे जाहीर केले. त्यानुसार या तरुणाकडे असलेले लॉटरी तिकिटाच्या माध्यमातून या तरुणाला लवकरच 51 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. लॉटरी खरेदी करुन आपले नशीब आजमणाऱ्या तरुणाचे नशीब खरोखरच फळाला आले आहे.