मुंबई : स्वच्छता आणि त्यासाठी आंघोळीचं महत्त्व माहीत असताना आंघोळ न करता कोणी आयुष्यभर राहत असेल यावर विश्वास ठेवणं अवघड होतं; पण नामीबियातल्या एका विशिष्ट जमातीतल्या स्त्रिया खरोखर तसं करतात.
आफ्रिका खंडात अनेक आदिवासी जमाती आढळतात. त्या जमातींनी त्यांचं वैशिष्ट्य जपलं आहे. त्यापैकी एक म्हणजे उत्तर नामीबियात असलेली हिम्बा जमात. या जमातीतल्या स्त्रिया आयुष्यात एकदाच आंघोळ करतात. हे ऐकायला जरी किळसवाण वाटत असलं तरी हे सत्य आहे. त्या जमातीतल्या महिला केवळ त्यांच्या लग्नाच्या दिवशीच आंघोळ करतात. बाकी इतर वेळी म्हणजे संपूर्ण आयुष्यभर त्या बिनआंघोळीच्या राहतात. विशेष म्हणजे आंघोळ केली नाही तरी त्यांना सर्वांत सुंदर समजलं जातं.
या जमातीच्या महिला आंघोळीऐवजी खास वनस्पतींचा उपयोग करून धूपन करतात. त्या वनस्पतींच्या धुरामुळे त्या स्वतःचं शरीर ताजंतवानं ठेवतात. त्यामुळेच त्यांच्या शरीराला घाण वास न येता सुगंध येतो असं त्यांचं म्हणणं आहे. या धुरामुळे त्यांचं जीवजंतूंपासूनही संरक्षण होतं.
या महिला आयुष्यात केवळ एकदाच आंघोळ करतात, ते म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशी. खरं तर त्यांना पाण्याला स्पर्श करण्यासही मनाई असते. त्यामुळेच त्या महिला कपडेही धूत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या महिला या परंपरेचं पालन करत आहेत. या महिला प्राण्यांची चरबी आणि हेमेटाइट यापासून तयार केलेलं एक लोशन अंगाला लावतात. त्यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्यांचं संरक्षण होतं. हेमेटाइटमुळे त्यांच्या त्वचेचा रंग लालसर होतो. तसंच त्यांचं किड्यांपासूनही संरक्षण होतं. या महिला ही परंपरा खूप वर्षांपासून पाळत आहेत. ती विचित्र वाटत असली तरी त्या महिला आयुष्य याच प्रकारे जगतात.