राजापूर:-यावेळची विधानसभा निवडणूक खुद्दारी विरुद्ध गद्दारी अशी असेल, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गुहागर आमदार भास्कर जाधव यांनी राजापूर येथे पत्रकार परिषदेत केले.
राजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राजापूर येथे मातोश्री सभागृहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जाधव यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला. ते म्हणाले, राजापूर विधानसभा मतदारसंघात गेली २० वर्षे आमदार म्हणून नव्हे तर मतदारांचा भाऊ म्हणून राजन साळवी यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सुमारे १८० ते २०० जागा मिळतील.
राज्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यातील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूरची जागा काँग्रेसला न मिळाल्याने थेट महाविकास आघाडीला आव्हान देत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत विचारले असता श्री. जाधव म्हणाले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड हे आपले चांगले मित्र आहेत. ते निश्चितच निवडणुकीतून माघार घेतील आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील.
या विधानसभा निवडणुकीत राज्यातील चित्र कसे असेल त्यावर बोलताना राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून सुमारे १८० ते २०० जागा नक्की मिळतील असा जोरदार आत्मविश्वास श्री. जाधव यांनी व्यक्त केला.