रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही.त्यांना एकही जागा सोडण्यात आली नाही.
या निवडणुकीमध्ये कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे आणि शिंदे यांची सेना आमने सामने आहे. मात्र जिल्ह्यात होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाला एकही जागा मिळवता आलेली नाही. याबरोबर काँग्रेसलाही संधी मिळालेली नाही.
जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, दापोली, गुहागर आणि राजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथे काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार निवडणूक लढवताना दिसणार नाहीत. रत्नागिरी आणि गुहागर या दोन मतदारसंघांसाठी स्थानिक भाजप नेते आग्रही होते. तशी तयारी त्यांनी केली होती. मात्र दोन्ही मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार असल्याचे जागा वाटपात निश्चित झाले आहे. उमेदवारी मिळत नसल्याने भाजपच्या बाळ माने यांनी पक्षत्याग करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे, तर विदर्भातील एका जागेच्या बदल्यात गुहागरची जागा शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. विनय नातू पुन्हा एकदा प्रतीक्षा यादीवर गेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडून राजेश बेंडल उमेदवार असणार आहेत. राजापूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.