चिपळूण:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यावसायिकांवर चिपळूण पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे. त्यानुसार रविवारी तालुक्यातील कळंवडे-वरपेवाडी येथे गावठी दारुच्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली. यावेळी 1 लाख 43 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदेश सदाशिव वरपे (24, कळंवडे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पांडुरंग शिवाजी पाटील (47, चिपळूण पोलिस ठाणे) यांनी दिली आहे.
तालुक्यातील कळंवडे-वरपेवाडी येथील धरणाच्या शेजारील वहाळाच्या किनारी झाडीझुडपाच्या आडोशाला गैरकायदा गावठी दारु गाळण्यासाठी हातभट्टी बांधून त्याव्दारे गावठी दारु गाळीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरतेश हारगुरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अशोक राठोड, हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर, प्रितेश शिंदे, चालक राजेंद्र चव्हाण आदींच्या पथकांनी त्याठिकाणी धाड टाकली. त्या धाडीत वरपे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. या हातभट्टी ठिकाणी 1 लाख 35 हजार 450 रुपये किंमतीचा 3870 लिटर गूळ नवसागर मिश्रित कुजके रसायन, 6 हजार 300 रुपय किंमतीची 60 लिटर गावठी हातभट्टीची दारु तसेच 1 हजार 200 रुपये किंमतीची एक ऍल्युमिनिअमचा गोलाकार डेग, 130 रुपये किंमतीचे स्टीलचा चाकू असा 1 लाख 43 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच हातभट्टीची देखील दारू. उद्ध्वस्त केली.