रत्नागिरी:-शहरातील माळनाका येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. संतोष वासुदेव सोनार (40) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अपघाताच घटना रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी संतोष याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवला आहे.
दत्तप्रसाद वासुदेव गोडसे (77, रा. संमित्रनगर रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. गोडसे हे माळनाका येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी ते सकाळी माळनाका येथील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते माळनाका येथे आले. यावेळी रस्ता ओलांडत असताना त्यांना दुचाकी (एमएच 08 एयु 2615) चालकाने जोरदार धडक दिली या आपघातात गोडसे यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.