राजन साळवी यांचा उदय सामंतांवर घणाघात
रत्नागिरी:-उदय सामंतांचा इतिहास काय तर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरे आजारी असताना सामंत हे शिंदे-भाजपसोबत गेले, अशा स्थितीत उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याने सर्व मतदारांच्या मनात चीड आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सामंतांचा निकाल लागणार, असा इशारा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिला आहे.
रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे सेनेतर्फे बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात साळवी बोलत होते. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके,तालुकाप्रमुख बंडया साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, प्रांतिक नेते बशीर मुर्तझा, बारक्याशेठ बने, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश शहा, कॉंग्रेसचे नेते अनिरुद्ध जाधव, हारीस शेकासन, संजय साळवी, वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, महेंद्र झापडेकर, दीपक सुर्वे, मंगेश साळवी, मनीषा बामणे, बिपीन शिवलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात आमदार राजन साळवी यांनी सामंत बंधुंवर जोरदार तोफ डागली. कोकण म्हणजे शिवसेना असे समीकरण आहे. त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.
युतीचे आमदार असताना बाळ माने यांनी उंच भरारी घेतली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व अन्य कार्यात ठसा उमटविला. मात्र, सामंतांनी आधी शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. पक्षप्रमुखांनी त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिले. मात्र, त्यांनी पदाचा दुरुपयोग केला, असा आरोप आमदार साळवी यांनी केला.