राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
चिपळूण:-चिपळुणातील एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील रईस अलवी (४८, गोवळकोट रोड) याच्याविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईस हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
येथील पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही शहरातील खंड विभागातील रहिवासी असून रईस अलवी याला ०१ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत टप्प्याटप्याने १३ लाख १९ हजार रुपये दिले होते. भाजीपाला- कांदा-इंपोर्ट एक्सपोर्टमध्ये व्यवसाय करण्यासाठी ही गुंतवणूक करत असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच त्या मोबदल्यात दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिषही दाखवले होते, त्यासाठी टप्प्याटप्प्याने रक्कम घेतली. मात्र ठराविक कालावधी नंतर ही महिला पैसे परत मागणेसाठी गेल्या असता आरोपीत यांनी उडवाडवीची उत्तरे देऊन महिलेची आर्थिक फसवणुक केली. रईसकडे वारंवार पैशाची
मागणी करूनही त्याने दाद दिली नाही. तेव्हा त्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी भारतीय दंड विधान
कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे करत आहेत.