कर्जही कोटीत: आलिशान वाहने, शेतजमीन, इमारतींचा समावेश
चिपळूण : संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रशांत बबन यादव यांनी सादर केलेली मालमत्ता कोटीच्या घरात आहे. या मालमत्तेत काही आलिशान वाहने, शेतजमीन, इमारतींचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्यावर असलेले कर्जही कोटीच्या घरात आहे, ही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे.
प्रशांत यादव यांनी गुरुवारी महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी दिलेल्या मालमत्ता विवरण पत्रानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख ८८ हजार ४०० रुपये व त्यांची पत्नी स्वप्ना यादव यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख ८५ हजार ३९७ रुपये इतके आहे. याशिवाय प्रशांत यादव यांच्याकडे ४५ हजारांची रोकड व त्यांच्या पत्नीकडे ५० हजार ५०० ची रोकड आहे. तसेच विविध बँका व पतसंस्थांमध्ये प्रशांत यादव यांची १ कोटी २ लाख ७६ हजार ४६४ रुपये, तर स्वप्ना यादव यांची ठेव १६ लाख ९१ हजार ४४ रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे स्थूल मूल्य स्वरूपात ४ कोटी ५४ लाख ८१ हजार ४२१ रुपयांची तसेच स्वप्ना यादव यांच्याकडे ५ कोटी ३४. लाख १५ हजार ९४६ रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये काही आलिशान गांड्याचा समावेश आहे. त्यांच्याकडे ३४ लाख १७ हजार २२५ रुपयांची, तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी २२ लाख २० हजाराची शेतजमीन आहे. याशिवाय प्रशांत यादव यांच्या नावे ४ कोटी ९९ लाख ८८ हजार ३५७ रुपयांचे आणि पत्नी स्वप्ना यादव यांच्या नावे २ कोटी २९ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे विविध बँकांचे कर्ज आहे.