राजापूर : राजापूर रोड रेल्वेस्टेशन येथे एका रेल्वे कर्मचाऱ्याचीच दुचाकी भरदिवसा चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी शशिकांत विष्णू राणे यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील मोसम राणेवाडी येथील शशिकांत राणे हे रेल्वे विभागात ट्रॅक मन म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार 22 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता ते आपल्या दुचाकीने राजापूर रेल्वेस्टेशन येथे कामावर हजर झाले. रेल्वेस्टेशनच्या बाहेरच्या बाजूला रेल्वे कर्मचाऱ्याना गाडया लावण्यासाठी शेड असून त्या ठिकणी त्यांनी आपली दुचाकी पार्क करून ठेवली व ते कामासाठी निघून गेले. सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर सुमारे 7 च्या सुमारास ते शेडमध्ये गाडीच्या ठिकाणी आले असता त्या ठिकाणी दुचाकी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी आढळली नाही. त्यामुळे ही दुचाकी (क्र.एमएच 08 एम 0313) चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद राणे यांनी राजापूर पोलीस स्थानकात दाखल केली.