रत्नागिरी:-साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धेचा आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.अंक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
लेख स्पर्धेत बाबू घाडीगावकर (दापोली) यांच्या लेखाला प्रथम, तर विराज चव्हाण (वाटूळ) यांच्या लेखाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तिसरा क्रमांक सौ. स्वानंदी जोगळेकर (साखरपा) आणि प्रकाश गोसावी (विरार) यांच्या लेखांना स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार-लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या लेख स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
चित्रकला स्पर्धेत सोनवडे (संगमेश्वर) येथील विष्णु गोविंद परीट यांच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, त्यांनी काढलेले चित्र अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दुसरा क्रमांक सुयोग चंद्रकांत रहाटे (नांदळज, संगमेश्वर), तर तिसरा क्रमांक साहिल सुरेश मोवळे (किरडुवे, संगमेश्वर) यांच्या चित्रांना मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कलाशिक्षक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जे. डी. पराडकर यांनी चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.