रायगड:-विधानसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.१५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १०७ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ८८ आरोपीना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये ३७,५२० लि.दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये २६ लाख ६१ हजार २१२ आहे.
अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम ९३ अंतर्गत एकूण ६१ प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत , त्या पैकी १४ कलम-९३ अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर संशयित आरोपी ज्ञात पत्यावर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ (फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम १४९) नुसार संबंधीताना गुन्हयापासून परावृत्त करण्याकरीता एकूण ४७० कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुक- २०२४ आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुक-२०२४ आचारसंहिता कालावधीत या विभागाची ७ पथके तैनात असून पथकांस आंतरराज्यीय मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही याकरीता रायगड जिल्ह्यात शेडूंग, ता.पनवेल, आणि चांडवे, ता.पोलादपूर येथे २ तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत. तेथे संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस ॲप क्र. 8422001133 व टोल फ्रीक्र.18002339999 व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दूरध्वनी क्रमांक 02141-228001 वर संपर्क संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले आहे.