लांजा:-मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर बसस्थानकासमोर गोव्याकडून आलेल्या आयशर टेम्पो (क्र. एम.एच.12.युएम.2576) हे वाहन थांबवून राज्य उत्पादन शुल्क पथकाने तपासणी केली. त्यामध्ये गोवा राज्यात विक्रासाठी असलेले विदेशी मद्याचे 1058 बॉक्स (9949.0 लि.) मिळून आले. मद्य व आयशर टेम्पो असा एकूण रुपये 1 कोटी 2 लाख 35 हजार 440 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेडगे यांनी पत्रकारांना दिली.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी बीट क्र.3 रेडींग स्टाफसह अवैध मद्यावर कारवाईं कामी रात्रगस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर बसस्थानकासमोर गोवा राज्याच्या दिशेकडुन आलेला आयशर टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे 1058 बॉक्स (9949.0 लि.) मिळून आले. या गुह्यात परराज्यातील मद्य व आयशर टेम्पो असा एकूण 1 कोटी 2 लाख 35 हजार 440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 81, 83, 90 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एस.एन.इंगळे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पान शुल्क, भरारी पथक हे करीत आहेत.
बुधवार 23 ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना चांदेराई ते देवधे रस्त्यावरुन देवधे तिठयावर आलेली मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार क्र.(एम.एच.द8.झेड.2888) या संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बनावटीचे 59.84 लि. विदेशी मद्य व 30.24 लि. देशी मद्य अवैधरित्या वाहतुक करताना मिळून आले. या गुह्यात अवैध देशी-विदेशी मद्य व स्वीफ्ट कार असा एकूण 4 लाख 8 हजार 220 रुपये किंमतीचा मुद्देमाल जफ्त करुन आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 कलम 65 (अ) (ई) अन्वये गन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अमित पाडाळकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा भरारी पथक रत्नागिरी हे करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेडग,s अधीक्षक व उप अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस.एन.इंगळे भरारी पथक, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडाळकर, सचिन यादव – दुय्यम निरीक्षक, जिल्हा भरारी पथक, चंद्रकांत कदम दुय्यम निरीक्षक, बीट क्र.03 व त्यांचा रेडींग स्टाफ यांनी ही कारवाई केली.