चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील रावतळे फाटा येथे रविवारी झालेल्या अपघातप्रकरणी कंटेनर चालकावर बुधवारी गुन्हा दाखल केला. अपघातातील गंभीर जखमी महिलेची प्रकृती आता स्थिर असून उपचार सुरू आहेत.
महमंद फरीद खान (वय ३८, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वार शमीन सुलतान सनगे (कान्हे पिंपळी) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. तिच्या हातावरून कंटेनर गेल्याने गंभीर दुखापत झाली आहे.
संबंधित महिला शहरातील बहादूरशेख नाका येथून शिवाजीनगरच्या दिशेने येत होती. यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने चाललेल्या कंटेनर चालकाने संबंधित महिलेच्या दुचाकीला धडक दिली. यात ही महिला अचानक रस्त्यावर कोसळली आणि तिचा हात कंटेनरच्या चाकाखाली सापडला. त्याचवेळी गाडीवर बसलेले लहान मूल दुसऱ्या बाजूला पडले. या घटनेनंतरही कंटेनर चालकाने घटनास्थळावरून कंटेनरसह पळ काढला होता; मात्र त्याला काही नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या अपघातात कंटेनर चालक दोषी आढळल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने आवाज उठवून या घटनेस जबाबदार असलेल्या महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.