रत्नागिरी:- राज्यात एमपीएससीच्या ‘गट ब ‘ आणि ‘गट क’च्या सहाय्यक कक्ष अधिकारी, उद्योग निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व तत्सम पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन ॲप्लिकेशन करताना उमेदवारांना तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागत आहे. अशा कारभारामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत, संवर्गातील एकूण ४८० पदांच्या भरतीकरीता तर गट-क मधून १३३३ पदाच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत आहे. यासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी सुरू झाले आहे. मात्र, गेले दोन -तीन दिवसांपासून https://mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन करताना ई-मेल व्हेरिफिकेशन केल्यानंतर येणारा ओटीपी बराच वेळ उलटून सुद्धा येत नाही. त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू देखील करता येत नाही असे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भरती प्रक्रिया राबवून उमेदवारांना खुश करण्याचा प्रयत्न तर हा नाही ना? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात उमेदवार गेले तीन दिवस एमपीएससी कार्यालयाशी संपर्क करत आहेत मात्र लवकरच दुरुस्ती केली जाईल असे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. परंतु लवकरच म्हणजे किती वेळ लागणार आहे हे सांगितले जात नसल्याने भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण होत आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२४ असून त्यापूर्वी आहे. उमेदवारांना फॉर्म भरताना येणारी अडचण सर्वत्र महाराष्ट्रभर येत आहे. त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जावी अशी मागणी देखील उमेदवारांकडून केली जात आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फॉर्म भरण्याचा कालावधी वाढवावा जेणेकरून सर्व उमेदवारांना दिलासा मिळेल अशी विनंती अविनाश पवार (चिपळूण, रत्नागिरी) यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधीनी निवडणुकीत गुंतले
निवडणुक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील निवडणुकीत दंग आहे. या भरतीमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात. मात्र संकेतस्तळावर ऑनलाईन अर्ज सादर करताना समस्या निर्माण होत असल्याने अनेक उमेदवार या भरतीला मुकण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकप्रतिनिधी गुंतले असल्याने त्यांचे देखील दुर्लक्ष होत आहे.