लांजा:-मतदार संघात जाऊन मतदारांसमोर जाऊन हात जोडायचे, थोडे भावनिक व्हायचे आणि डोळ्यात पाणी आणायचे हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे लांजा राजापूर मतदार संघात सुरु होता. त्यामुळे काही लोकांनी भावनेच्या आधारे गेली १५ वर्षे लांजा राजापूर मतदार संघाला मागे टाकले असा खोचक टोला अप्रत्यक्षपणे आमदार राजन साळवी यांना उदय सामंत यांनी लांजा येथे बोलताना लगावला.
लांजा शहरातील आग्रे हॉल येथे सोमवारी पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना शिंदे गट पक्ष लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल (राजू) कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेवक सचिन डोंगरकर, क्षेत्रसमन्वयक एस.एन.कांबळे, जिल्हा सचिव वसंत घडशी, क्षेत्र संघटिका मानसी आंबेकर, उप तालुकाप्रमुख सुजित आंबेकर, सुहास खामकर, दादा पक्ती, युवा अधिकारी राजू धावणे, युवती अधिकारी अनुष्का कातकर, तालुका संघटिका मानसी आंबेकर, नगरसेवक नंदराज (लल्ल्या) कुरूप, बापू लांजेकर, प्रसाद डोर्ले तसेच प्रसाद भाईशेट्ये, राहुल शिंदे, विभागप्रमुख दिनेश पवार, संतोष साटले, विभाग संघटक नामदेव कानडे, उपविभाग प्रमुख निखिल माने आदींसह शिवसेना शिंदे गट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाच्या नावाने बोजवारा उडाला होता. मात्र येणारा भविष्य काळामध्ये किरण सामंत यांच्या माध्यमातून हा बॅक लॉक भरून काढला जाईल, असा शब्द मंत्री उदय सामंत यांनी यावेळेस दिला. आजची निष्ठेचे गोष्टी सांगत आहेत हेच आमच्या संपर्कात होते ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार होते. त्यासाठी अनेक गोष्टी घडल्यात त्या मी या ठिकाणी बोलू शकत नाही. मात्र नको त्या गोष्टी बाहेर काढल्या तर मलाही काढाव्या लागेल असा सज्जड इशाराही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
लांजा तालुक्यात शिवसेना उबाठा पक्षाला धक्क्यावर धक्के मिळत असून विद्यमान आमदार राजन साळवी यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे उबाठा गटाचे लांजा तालुका युवाधिकरी प्रसाद माने आणि उपविभाग प्रमुख चेतन खंदारे यांनी राजन साळवी यांना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट पक्षात नुकताच प्रवेश केला आहे.
लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात पक्षफुटीचे वातावरण पाहायला मिळत असून किरण सामंत यांच्याकडे येणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. किरण सामंत यांचे नेतृत्व स्विकारत शिवसेना उबाठा गटा पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश करत आहेत. दरम्यान याप्रसंगी करचुंब, शिपोशी, बोरिवळे, आडवली, तळवडे, जावडे, कुवे, पन्हळे, वाघणगाव, कोंड्ये आदीं गावातील हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश केला.