लांजा : कारमधून विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी खालापूर (रायगड) येथील एकाला ताब्यात घेतले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आलेल्या कारवाईत १२ लाख रुपयांची कार आणि ७ हजार ४०० रुपयांचा गोवा बनावटीचा दारूसाठा असा एकूण १२ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाणे मार्फत मुंबई-गोवा महामार्गावर वाहन तपासणी केली जात आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील हॅपी पंजाबी धाब्यासमोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कार (क्र.एमएच ४६ सीपी ३७१३) या गाडीची तपासणी केली असता गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. यामध्ये १ हजार ७०० रुपये किंमतीच्या रिझर्व्ह सेवन व्हिस्की दोन प्लास्टिक बाटल्या, १ हजार रुपये किंमतीच्या रॉयल स्टॅग व्हिस्की बाटली, ९२० रुपये किंमतीच्या रॉयल स्टॅग मार्क ऑफ प्युरिटी व्हिस्की एक बाटली त्याचप्रमाणे १ हजार ४५० रुपये किंमतीची ब्लॅक अँड व्हाईट स्कॉच व्हिस्की, ४०० रुपये किंमतीच्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट व्हिस्की, ८४० रुपये किंमतीच्या राॅक फोर्ड रिझर्व्ह व्हिस्की एक बाटली, ७०० रुपये जय ब्लेंडर प्राइड व्हिस्की काचेची बाटली त्याचप्रमाणे ३९० रुपये किंमतीचे ऑक्सस्मीथ इंटरनॅशनल ब्लेंडेड व्हिस्की काचेची एक बाटली असा एकूण ७ हजार ४०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि १२ लाख रुपये किंमतीची काळ्या रंगाची किया कंपनीची कार असा एकूण १२ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या कारवाईवेळी एफएसटी आणि लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह हेड.कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, हेड.कॉन्स्टेबल नासिर नावळेकर, पो.कॉन्स्टेबल नितेश राणे व पो.कॉन्स्टेबल नितेश आर्डे उपस्थित होते.
विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची विक्री तसेच दारूसाठा जवळ बाळगणे याप्रकरणी पोलिसांनी कार चालक संदेश विलास मांडे (३४ वर्षे, रा.खालापूर, जि. रायगड) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड.कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.