खेड:-टैंडम या दोघांनी चालवायच्या सायकल प्रकारात आग्रा ते उमलिंगला पास हे अंतर वेगात पार केल्याचा रेकॉर्ड मीरा वेलणकर व उत्कर्ष वर्मा या जोडीच्या नावावर आहे. त्यातील महिला सायकलिस्ट मीरा वेलणकर (रा.बंगळूर) यांनी खेड ते शिवतर खिंड वाडी या रस्त्यावर खेडचे सायकलपटू विनायक वैद्य यांचेबरोबर टैंडम राईड केली.
खेड येथील विनायक वैद्य यांच्याकडे टैंडम प्रकारातील सायकल आहे हे लक्षात घेऊन त्या खास बंगळूरहून खेडला आल्या होत्या. त्यांचे येथे स्वागत करण्यात आले. या भेटीत मीरा वेलणकर म्हणाल्या की, कोकणात सायकलिंगला वाव आहे व कोकणातल्या लोकांनी आपले आरोग्य व आनंद यासाठी हा छंद जरुर जोपासला पाहिजे.
कोकणातले हवामान व चढ-उतारांचे रस्ते व वृक्षराजी हे सायकलिंगच्या छंदासाठी अनुकूलं आहे. गिअरचे
तंत्र समजून घेतले तर या चढ-उतारांचे भय नाहीसे होते असा संदेश मीरा यांनी दिला आहे. रोज एक तास सायकलिंग केले तर अनेक आजार व वजन वाढ सहज रोखता येते.
शरीरात उत्साह वाढतो. कोकणात अजूनतरी शुद्ध हवा आहे त्यात सायकलिंग केले तर शरीराला भरपूर प्राणवायू मिळतो व आजार जवळ येत नाहीत. सायकलिंगच्या प्रसारासाठी खेड सायकलिंग क्लब असलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.