चिपळूण काँगेसच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन
महिलेला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी
चिपळूण (वार्ताहर) : शहरातील रावतळे विंध्यवाशिनी फाटा येथे झालेल्या अपघातामध्ये पिंपळी येथील महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. ठेकेदाराला सांगून सुद्धा ते या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे झालेल्या अपघाताची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. अपघातग्रस्त कारणीभूत असलेल्या कंपनी व व्यवस्थापक यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी चिपळूण काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक चिपळूण फुलचंद्र मेंगडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, रविवार दि. २० रोजी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर विंध्यवासिनी रोड जवळ (तलाठी दुकान) शेजारी ट्रेलर ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन एक महिला गंभीररित्या जखमी झालेली. तिला प्राथमिक उपचारासाठी लाईफकेअर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील वैद्यकीय उपचाराकरिता त्यांना मिरज येथे हलविण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या अपघाताबाबत चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झालेला असून या अपघाताची माहिती घेतली असता या अपघातास राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी ईगल कंपनी व्यवस्थापक जयंतीलाल जबाबदार असून रस्त्यावर साईडपट्टी न सोडता लावलेले बॅरीकेटस यामुळे येथे रस्ता अरुंद झालेला आहे. तसेच रस्त्यावर वाळूचे बारीक कण असल्यामुळे दुचाकी घसरण्याची शक्यता दाट असल्यामुळे अपघात होण्याची खूप मोठी शक्यता आहे, असे वारंवार जयंतीलाल यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले असताना देखील त्यांनी हे चुकीचे पद्धतीने बॅरीकेटस लावल्याने हा अपघात झाला आहे. यात महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. व त्यांच्या हाताला गंभीर इजा झालेली असून तिला उपचाराकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता सदर ईगल कंपनी व त्यांचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी चिपळूण तालुक्यातील जनतेची व चिपळूण तालुका कॉग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आहोत. तसेच यापुढे काही अपघात घडले तर याला जबाबदार ईगल कंपनी त्यांचे व्यवस्थापक राहतील. असे निवेदनाद्वारे त्यांनी सूचित केले आहे. सदरचे अपघातास ईगल कंपनी व्यवस्थापन जबाबदार असून या अपघातास कारणीभूत ठरवून ईगल कंपनी व्यवस्थापन निकृष्ट दर्जाचे व बेजबाबदारपणे काम करीत असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्या माध्यमातून सदर जखमी असलेल्या महिलेस आरोग्य उपचारासाठी लागणारा सर्व खर्च हा ईगल कंपनी व्यवस्थापक यांनी करावा, अशी मागणी चिपळूण तालुक्यातील जनतेची व चिपळूण तालुका कॉंग्रेस कमिटीने या निवेदनातून केली आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, उपाध्यक्ष सुबोध सावंत-देसाई, उपाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, सेवादल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, संतोष सावंत देसाई, अ.ल माळी, संजय साळवी, लियाकत शेख, दिपक निवाते, मैनुद्दीन सय्यद, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, शहराध्यक्ष विणा जावकर, माजी नगरसेवक सफा गोठे, रुक्सार बोट आदी उपस्थित होते.