चिपळूण:-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांनी अवैद्य धंद्यावर धाडसत्र सुरु केले असताना पुन्हा सोमवारी खेर्डी येथे सुमारे दीड लाख रूपयांचा विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील दगडू महाडिक (70,खेर्डी-विकासवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद प्रमोद रघुनाथ कदम (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच चिपळूण पोलिसांनी अवैध दारूधंद्यावर धाडी टाकून कारवाया सुरु केल्या आहेत. त्यानुसार आठवडाभरात मटका, गावठी दारुसह हातभट्टी, अवैध विदेशी दारुसाठा करणाऱया व्यावसायिकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असताना सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या खेर्डी येथे शुभम अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजूला असलेल्या नाल्याच्या शेजारी सुनील महाडीक याने अवैध विदेशी दारुसाठा करुन ठेवला असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून 1 लाख 46 हजार 65 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जफ्त केला. याप्रकरणी महाडिक याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.