लांजा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, लांजा एसटी आगारामार्फत दिनांक २५ ऑक्टोबर पासून लांजा ते पुणे स्वारगेट ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
लांजा तालुक्यातील अनेक नागरिक पुणे नोकरी निमित्त आहेत. मात्र पुणे येथे जाण्यासाठी लांजा येथून थेट एसटी बस उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता, आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी खास दिवाळी सणाच्या निमित्ताने लांजा-पुणे स्वारगेट ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही बससेवा सुरू राहणार आहे.
लांजा बस स्थानकातून सकाळी ९ वाजता ही बस निघणार असून, परतीसाठी रात्री ९:३० वाजता सुटणार आहे. या बसफेरीचे आरक्षण ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे, याचा तालुक्यातील प्रवासी वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी केले आहे.