संगमेश्वर:-शहरालगतच्या कसबा देवपाटवाडी येथे जमिनीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी चौघांना सहा महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. किशोर देवजी चांदे (54), शुभम राजेश चांदे ( 21), राजेश देवजी चांदे (46), आदित्य राजेश चांदे (19, सर्व राहणार कसबा देवपाटवाडी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
संतोष रघुनाथ चांदे आणि किशोर चांदे हे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच वाडीत राहणारे आहेत त्यांच्यात जमिन जागेवरून वाद आहे. कसबा देवपाटवाडी या ठिकाणी त्यांच्या घराजवळ मोटार सायकल लावण्यासाठी संतोष रघुनाथ चांदे हे प्लास्टिकची शेड बांधत असताना किशोर देवजी चांदे यांनी तुम्ही या ठिकाणी काय करत आहात असे बोलून संतोष चांदे यांची पत्नी संपदा संतोष चांदे यांच्या कानाखाली मारून शिवीगाळ केली. त्यानंतर आणखी तिघेजण त्या ठिकाणी येऊन एकमेकांच्या सहाय्याने धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच दत्ताराम चांदे यांच्या डोक्यात डाव्या बाजूला मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी किशोर देवजी चांदे, शुभम राजेश चांदे, राजेश देवजी चांदे, आदित्य राजेश चांदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी देवरुख न्यायालयाने आरोपींना सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी 7000 द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी तपासीक अंमलदार म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष झापडेकर, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सौ कामेरकर यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकारी वकील म्हणून श्रीमती अमृता गुरुपादगोळ यांनी कामकाज पाहिले.