सिंधुदूर्ग:-महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या निळ्या लाटांच्या दर्शनाला तारकर्ली समुद्र किनाऱ्यापासून सुरुवात झाली आहे.
सोमवार दि २१ ऑक्टोबर रोजी तारकर्लीच्या किनाऱ्यावर चकाकणारी निळी चादर पसरल्याचे चित्र दिसले. त्यामागचे कारण म्हणजे ‘बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स'( नोक्टीलिका) हा सूभ्म जीव. या समुद्री सूक्ष्म जीवांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे समुद्राच्या लाटांवर निळा प्रकाश पसरतो. मात्र, या जावांची अमर्यादित वाढ सागरी परिसंस्थेला घातक असून त्यामुळे माशांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत सागरी अभ्यासकांनी मांडले आहे.
महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर आदळणाऱ्या लाटा निळ्या रंगाने प्रकाशित होत असल्याचे दिसून येत आहे.
मराठीत याला जीवदीप्ति म्हणतात. तारकर्ली एमटीडीसीचे सुरज भोसले यांनी सोमवारी सायंकाळी सुर्यास्तानंतर किनाऱ्यावर चमकणाऱ्या लाटांची नोंद केली. ‘बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स’ या सूक्ष्म जीवांच्या शरीरामधून निघाणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे लाटांवर निळा रंग पसरला आहे. मात्र, या जीवांचे दर्शन राज्याच्या किनारपट्टीवर पहिल्यांदा झालेले नाही.
गेल्या दहा वर्षांपासून या जीवांचे दर्शन रात्रीच्या वेळी किनारपट्टीच्या भागात होत आहे. ‘बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स’ हे जीव मोठ्या प्रमाणात किनाऱ्यापट्टीनजीकच्या भागात येतात. या जीवांना धोका जाणवल्यास ते आपल्या शरीरातून चकाकणारा निळा प्रकाश उत्सर्जित करतात. समुद्राच्या लाटा एकमेकांवर आदळल्यामुळे या जीवांना धोका निर्माण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ते निळा प्रकाश उत्सर्जित करत असल्याने लाटांवर निळा प्रकाश पसरतो.