रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पेण हद्दीतील रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दर्शन चंद्रकांत रहाटे (38, रा. कोकणनगर, भांडुप-मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारासाठी पेण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वैभव वसंत चव्हाण (39, रा. कामोठे-पनवेल) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेजण दुचाकीवरून (एम.एच.06/सी.ई. 3360) पेणहून पनवेलकडे जात होते. अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अपघातात दर्शन रहाटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच पेण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना मदतकार्य केले. दुचाकीस धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी नाकाबंदीही करण्यात आली. मात्र अज्ञात चालक पसार झाला. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.