चिपळूण:-तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण पोलिसांनी धाड टाकून एका तरुणाकडून 59 हजार किंमतीचा 990 ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी त्या तरुणाला अटक करण्यात आली असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रोहिदास बाळू पवार (28, पिंपळी खुर्द) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद वृषाल शेटकर (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.
पिंपळी खुर्द येथे विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा करुन ठेवला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे प्रकटीकण पथकाला मिळाली होती. त्यानुसार रोहिदास पवार याची चौकशी केली असता त्याच्याकडे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तपकिरी रंगाची पाने, फुले, गांजासदृश पदार्थ आढळून आला. जवळपास 990 ग्रॅम वजनाचा असलेला हा गांजासदृश पदार्थ 59 हजार 400 रुपये किंमतीचा आहे.
याप्रकरणी रोहिदास याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वीदेखील चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल रोशन पवार, प्रमोद कदम, संकेत गुरव, महिला पोलीस किरण चव्हाण आदींच्या पथकाने केली. दरम्यान, सोमवारी येथील न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.