आता नेटवर्क नसलेल्या दुकानांमध्ये मार्गदूत करणार मदत
रत्नागिरी:-राज्यात सुमारे दीड कोटी शिधापत्रिका धारकांना ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप केले जाते. मात्र 10 टक्के शिधापत्रिकाधारक नेटवर्क अभावी वंचित राहत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. यामुळे ही संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. नेटवर्क नसलेल्या दुकानांसाठी मार्गदूत नेमण्यात येणार असून त्यांच्या ठशांच्या आधारे धान्य वितरण करण्यात येणार आहे.
डोंगराळ भागातील रेशनदुकानदारांना नेटवर्क अभावी धान्य वितरणाची अडचण येत असेल ती सोडवण्यासाठी सरकारने आता रुट नॉमिनी म्हणजे मार्गदूत नेमण्याचे ठरवले आहे. त्यांच्या अंगठयाचा ठसा ई-पॉस मशिनला ग्राह्य धरण्यात येणार असून ज्यांना धान्य वितरण होत नाही अशा शिधापत्रिका धारकांना धान्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे धान्य वितरणाची लाभार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यातील रास्त दराच्या दुकानातील धान्य वाटप ई-पॉस मशिनद्वारे करण्यात येत आहे. सुरुवातीला ही यंत्रणा टू-जी नेटवर्कद्वारे जोडली गेली होती. मात्र सर्व ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसल्याने अडचणी येत होत्या. राज्य सरकारने आता टुजी ऐवजी 4 जी तंत्रज्ञानाचे नेटवर्क लागू करण्याचे ठरवले आहे. गेल्या 2 महिन्यांपासून हा बदल हळूहळू लागू होत आहे. अद्यापही डोंगराळ भागात आणि अतिदुर्गम भागात नेटवर्कची समस्या कायम आहे. दीड कोटी शिधापत्रिका धारकांपैकी 15 लाख शिधाधारकांना धान्य वितरण होत नसल्याचे लक्षात आले आहे. आता मार्गदूतामुळे धान्य वितरण सोयीचे होईल अशी अपेक्षा पुरवठा विभाग व्यक्त करत आहे.