चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील विंध्यवासिनी परिसरात रविवारी दुपारी 12 वाजता कंटेनर हातावरून गेल्याने महिलेच्या हाताचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला नागरीकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मात्र हा अपघात महामार्गाच्या कामासाठी बॅरेकेटस् थेट रस्त्यावर लावल्याने झाल्याचा आरोप होत आहे. शमिम सुलतान सनगे (कान्हे-मोहल्ला) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
सनगे या आपल्या दुचाकीवरून दोन मुलांसह शहराकडे येत होत्या. त्यांची दुचाकी रविवारी दुपारी 12 वाजता वरील ठिकाणी आली असता ती चिखल व खड्ड्यांमुळे घसरली. त्यामुळे त्या रस्त्याच्या उजव्या तर दोन्ही लहान मुले डाव्या बाजूला पडली. त्याचवेळी मागून महमद फरिद खान (38, उत्तरप्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन आला. मात्र बॅरेकेटसमुळे जागा नसल्याने त्याला तो बाजूला घेता आला नाही. त्यामुळे सनगे यांच्या हातावरून चाक गेल्याने हाताचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर खान याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नागरीकांनी त्याचा पाठलाग करून त्याला काही अंतरावर पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
जखमी झालेल्या सनगे यांना प्रथम एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांना मिरज येथे हलवण्यात आले आहे. या अपघाती पोलीस ठाण्यात नोंद करण्यो काम सुरू आहे. याप्रकरणी कंटेनर चालक खान याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून कंपनी व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.