लांजा : विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारू विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी धाड टाकून १८७५ रुपयांच्या गावठी हातभट्टीच्या दारूसाठ्यासह एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कुरचुंब येथे करण्यात आली.
तालुक्यातील कुरचुंब येथे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.५५ च्या सुमारास कुरचुंब मानेवाडी ते तापेकरवाडी जाणाऱ्या फाट्यावर दुकानाजवळ धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी संदेश राजेंद्र माने (वय ३५, रा.कुरचुंब मानेवाडी) हा गावठी दारूसह आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी १८ लिटरची गावठी हातभट्टीची १८७५ रूपयांची दारू जप्त केली.
विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्री प्रकरणी लांजा पोलीसांनी संदेश राजेंद्र माने याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड.कॉन्स्टेबल एस.एस.भुजबळराव हे तपास करत आहेत.