लांजा : तालुक्यातील भडे देऊळवाडी येथील शेतकरी प्रवीण गजानन तेंडुलकर यांच्या घराशेजारी शुक्रवारी सायंकाळी वीज पडली. या घटनेत नारळ आणि पोफळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या जोरदार पाऊसाने तालुक्यात सर्वत्र दैना उडवली होती. अशातच भडे देऊळवाडी येथील शेतकरी प्रवीण तेंडुलकर यांच्या घरालगत असणाऱ्या नारळ व पोफळीच्या बागेवर वीज पडली. यामध्ये दहा पेक्षा अधिक नारळ झाडे व पोफळीच्या पंधरा पेक्षा अधिक झाडांना विजेचा धक्का लागून ते जळून गेली आहेत.
दरम्यान, प्रवीण तेंडुलकर यांच्या नारळ आणि पोफळीच्या झाडांवर वीज पडून सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तरी शासनाच्यावतीने बागेची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेंडुलकर यांनी केली आहे.