लांजा : विधानसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर होताच पोलीस अधीक्षक रत्नागिरी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन तंतोतंत होण्याचे दृष्टीने लांजा पोलीस सतर्क झाले असून वाहनांची कसून तपासणी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
लांजा पोलिसांच्यावतीने लांजा शहरात प्रवेश करणार्या रस्त्यांवर तसेच विविध ठिकाणी तपासणी पथके तैनात करण्यात आले असून तीव्र स्वरूपाची नाकाबंदी करण्यात येत असल्याचे व नाकाबंदी दरम्यान कारवाया देखील केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोलीसांच्यावतीने लांजा शहरातील पथिक हॉटेल व इतर भागात २० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी एफएसटी पथकाचे अधिकारी पोलीस अंमलदार तसेच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सरंगले व वाहतूक अंमलदार उपस्थित होते.
एकंदरीत विधानसभा निवडणूक ही पोलीसांच्या माध्यमातून सुरक्षित व निर्भीडपणे पार पाडली जाईल, अशी चर्चा जनतेतून व्यक्त होत आहे.