मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर अनेक घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहेत. अशामध्ये आता एक नवीन बातमी समोर आली आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा सुरू आहे. अशामध्ये भाजपा लवकरच पहिली यादी जाहीर अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. अखेर रविवारी (20 ऑक्टोबर) भाजपाने बड्या नेत्यांच्या नावासह आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट आज आपली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. अशातच भाजपा खासदार नारायण राणे सुपुत्र निलेश राणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूननच जिल्ह्यात निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चेला उधाण आले होते. पण आता खुद्द निलेश राणे यांनी ही नुकतीच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार त्या ठिकाणी निलेश राणे यांना निवडणूक लढविण्याची संधी देण्यात येणार आहे. कुडाळ-मालवण विधानसभा लढविण्यास सज्ज माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला हाती घेणार धनुष्यबाण घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही म्हटले होते की, निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच आहे. कारण युतीमध्ये एकमेकांचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. आमची युती एवढी घट्ट आहे की, यात एकमेकांचे उमेदवार बदलले जातील, असे मतही केसरकर यांनी व्यक्त केले होते.