रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील बालनिरीक्षणगृहातून दोन मुले बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 15 व 18 ऑक्टोबर रोजी घडली. अचानक मुले बेपत्ता झाल्याने निरिक्षणगृहात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांकडून शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यानुसार शहर पोलिसांकडून या मुलांचा शोध सुरू आहे.
बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये एकाचे वय 14 वर्षे असून दुसऱ्याचे वय 17 वर्षे आहे. 14 वर्षीय मुलगा हा 17 फेब्रुवारी 2021 रोजी केरळ पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्ष कन्नुर यांच्याकडून बाल निरीक्षण गृह रत्नागिरी येथे दाखल करण्यात आला होता. 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6.50 वाजण्याच्या सुमारास हा मुलगा निरीक्षणगृहात शयनकक्षात झोपलेला दिसून आला. यानंतर तेथील कर्मचारी लाईट बंद करण्यासाठी गेले असता यानंतर हा मुलगा आपल्या बेडवर दिसून आला नाह़ी. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
तर 17 वर्षीय मुलगा हा बालकग्राम एसओएस चिल्ड्रेन व्हिलेज येरवडा पुणे यांचेकडून 19 एप्रिल 2024 रोजी बालनिरीक्षण गृह रत्नागिरी येथे दाखल केले होते. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता टिव्ही पाहत बसला होत़ा. यानंतर सकाळी 11.30 वाजण्याच्या बाथरूमला जातो असे कर्मचाऱ्याना सांगितले. त्यानंतर तो बालनिरीक्षण गृहातून बेपत्ता झाला अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.