राजापूर:-तालुक्यातील बहुतांश घरकुल लाभार्थीना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली असून पुढील हप्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने घरकुल उभारणीसाठी उधार, उसनवारी केलेल्या लाभार्थीच्या पाठी आता उसनवारीवाले लागले आहेत. तर पुढील हप्ते मिळालेले नसल्याने अनेकांच्या घरांची कामे ठप्प झाली आहेत. याबाबत विलास हर्याण यांनी संबधितांकडे निवेदन देत शासनाचे लक्ष वेधले आहे.
नातेवाईक, दुकानदार वा अन्य ठिकाणी उधार, उसनवारी करीत तालुक्यातील काही लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम केले आहे. काही लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्याचवेळी ज्यांनी घरकुल बांधकामासाठी आर्थिक मदत केली आहे त्यांच्याकडून उसनवारीच्या पैशाच्या मागणीसाठी तगादा लावला जात आहे. मात्र, घरकुल योजनेतील अनुदानाचे अनेक हफ्त्यांची रक्कमच शासनाकडून मिळालेली नसल्याने लाभार्थ्यांनी उधार-उसनवारी भागवायची कशी ? असा प्रश्न त्यांच्या समोर आवासून उभा राहीला आहे. याबाबत केळवली येथील सामाजिक कार्यकर्ते विलास हर्याण यांनी अन्य योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांकडे दुर्लक्ष का, त्यांना अनुदान देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शासनातर्फे घरकुल योजना राबविण्यात येत असून या योजनेतून कच्चे बांधकाम असलेल्या लोकांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार होत आहे. घरकुल योजनेतून लाभार्थ्यांला घर बांधकामासाठी साहित्य आणि मजूरी असे मिळून सुमारे 1 लाख 40 हजार रूपयांचे शासन अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी प्रशासकीय मंजूरीनंतर घराचे बांधकाम केले आहे. त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य खरेदी आणि मजूरीसाठी लागणाऱ्या रक्कमेसाठी उधार उसनवारही केली आहे. घरकुलाचे शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदानाची रक्कम उपलब्ध झाल्यानंतर उधार उसनवार भागविण्याचे लाभार्थ्यांनी नियोजनही केले आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना घरकुलांच्या शासकीय अनुदानाचे एक हप्ता वगळात अन्य हप्ते गेल्या काही महिन्यांपासून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे बांधकामासाठी घेतलेली उधार-उसनवार भागवायची कशी असा प्रश्न लाभार्थ्यांना भेडसावत आहे.
तर दुसरीकडे शासनाकडून अनुदानाची रक्कम प्राप्त न झाल्याने काहींच्या घरांचे बांधकाम अर्धवट स्थितीमध्ये राहीलेले असून अर्धवट राहीलेले बांधकाम पूर्ण कसे करायचे याची त्यांना चिंता सतावत आहे. शासन अनुदानाअभावी लाभार्थ्यांच्या निर्माण झालेल्या समस्येकडे श्री. हर्याण यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी मोठया प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. या योजनांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध होतो मात्र, घरकुलांसाठी अनुदानाचे हप्ते देण्यासाठी शासन हात आखडते का घेते ? असा सवाल श्री. हर्याण यांनी उपस्थित केला आहे. घरकुल योजनेच्या अनुदानाच्या रक्कमेचे शिल्लक राहीलेल्या हप्त्याची रक्कम शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.