राजापूर:-राजापूर तालुक्यात गेले दोन दिवस वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस कोसळत असल्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे. भराडे शिवसेना (शिंदेगट) शाखाप्रमुख सागर जाधव यांचे घर शुक्रवारी झालेल्या वादळ व अतिवृष्टीमुळे कोसळून सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोण नसल्याने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
परतीच्या पावसाने राजापूर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहे. तर काही नागरीक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. शेती कापणीयोग्य झाली असून काही ठिकाणी भातकापणीला सुरूवात देखील झाली होती, अशातच परतीच्या पावसाने जोर धरल्याने भातकापणीची कामे रखडली आहेत. तर काही शेतकऱयांनी कापलेले भात पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्याचे देखील नुकसान झाले आहे. शुक्रवारी नाटे परीसरात झालेल्या वादळी वाऱ्यासहीत अतिवृष्टीत सागर जाधव यांचे घर रात्री 1.30 वा. सुमारास पुर्णत: कोसळून पडले आहे. यावेळी जाधव यांच्या काकी या आजारी असल्याने माहेरी गेल्या होत्या. अन्यथा मोठा बाका प्रसंग उदभवला असता. यामध्ये त्यांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान पणेरे येथील काही घरातील वीजमीटरसह देखील जळून खाक झाले आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. जाधव यांचे घर कोसळून पडल्याची माहीती मिळताच सेनेचे विभागप्रमुख मनोज आडवीरकर, युवासेना विभागप्रमुख अजित बंडबे, महिला विभाग प्रमुख स्वरा भोसले व राजवाडी पानेरेचे शाखाप्रमुख तुषार बंडबे यांनी जाऊन पाहणी केली. ही बाब सेना नेते यांच्या निदर्शनास आणून दिली असून लवकरच सेनेच्या वतीने मदत केली जाणार असल्याची माहीती मनोज आडवीरकर यांनी दिली.