जिल्ह्यात कुठेही अवैध दारू विक्री होत असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांकावर संपर्क साधा
रत्नागिरी:-जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने अवैध दारुधंदे व हातभट्टीवर पोलिसांकडून धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील हातभट्टी पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आल़ी. या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
मिरजोळे पाटीलवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत मयुर रवी मोरे (38, रा.कोकणनगर, रत्नागिरी) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुरुगवाडा येथे गावठी दारु बाळगल्याप्रकरणी विलास एकनाथ चव्हाण (54, रा.जुवे चव्हाणवाडी, रत्नागिरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर पावस बाजारपेठ येथे गावठी दारु बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध पूर्णगड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभाग व पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. अवैध दारुधंद्याविरुद्धच्या कठोर कारवाई करण्यासाठी या उत्पादन शुल्क विभागाकडून 4 पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारुधंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने 1 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण 80 गुन्हे दाखल केले आहेत. या गुह्यात हातभट्टीची गावठी दारु 2,032 लिटर, देशी मद्य 13.68 लिटर, विदेशी मद्य 9 लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य 205.65 लिटर, रसायन 31,150 लिटर, फ्लास्टिकचे बॅरल, कॅन व काचेचे ग्लास असा एकूण रुपये 15 लाख 44 हजार 410 किंमतीचा मुद्देमाल जफ्त करण्यात आला आहे. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरुन प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द अशी कारवाई येथून पुढेही सुरु राहील.
जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्सऍप क्रमांक-8422001133 व टोल फ्री क्रमांक- 18002339999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक शेडगे यांनी केले आहे.