दापोली : तालुक्यातील पिसई फाटा येथे विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा ट्रक लाकूडफाटयासह वनविभागाने जप्त केला. या कारवाईत वनविभागाने 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संदीप घाटे (भोर-पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
माटवण फाटा ते पिसई दरम्यान वन विभागाची गस्त सुरू असताना त्यांना एक ट्रक (एमएच- 12-क्यू.डब्ल्यू. 4426) विनापरवाना 42.336 घ.मी. जळावू लाकूड वाहतूक करताना आढळून आला. या प्रकरणी संदीप घाटे (भोर-पुणे) याच्यावर भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 41, 42, 52, 65, 66 अन्वये दापोली वनपाल आर. डी. खोत यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जळावू लाकूड मालासहीत ट्रक असा सुमारे 20 लाख 23 हजार 454 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण), प्रकाश पाटील, वनक्षेत्रपाल दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास खोत, वनपाल दापोली, वनरक्षक श्रीमती शुभांगी भिलारे, विश्वंभर झाडे यांनी केली.