जैतापूर/राजन लाड:-गावातील मतदान केंद्रांची ग्रामपंचायत फंडातून दुरुस्ती करण्याचे ग्रामपंचायतीला आदेश देण्यात आले आहेत. दुरुस्ती कामात हलगर्जीपणा केल्यास प्रशासकीय कारवाईचा गटविकास अधिकाऱ्यांकडून इशारा देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहिता सुरु आहे. तसेच आगामी कालावधीत विघानसभा निवडणूकीचे अनुषंगाने मतदान केंद्रावर ग्रामपंचायतीचे अधिनस्त असणाऱ्या शाळांमध्ये दिनांक २०/११/२०२४ रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, मतदान केंद्र असलेने सदर मतदान केंद्र सुस्थितीत असणे आवश्यक आहे. करीता सदर मतदान केंद्राची आवश्यक देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. आपले अधिनस्त मतदान केंद्राना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी मोठया व मध्यम स्वरुपाच्या दुरुस्ती करावयाच्या असलेल्या शाळांची यादी तयार केलेली आहे व प्राप्त यादीनुसार बांधकाम विभागामार्फत मतदान केंद्र घोषित केलेल्या शाळांची दुरुस्ती करणेची कार्यवाही सुरु आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता शिक्षण विभागाकडून मतदान केंद्र असलेल्या शाळा दुरुस्तीची यादी सादर करताना मोठ्या व मध्यम स्वरुपाच्या दुरुस्ती असलेल्या मतदान केंद्राची यादी तयार केलेली असलेने सदरची कार्यवाही करताना मतदान केंद्रावरील किरकोळ स्वरुपाची दुरुस्ती राहून गेल्याची बाब निदर्शनास येत आहे. सदरची किरकोळ दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. जेणे करुन मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची गैरसाय होणार नाही व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल.
तरी याव्दारे आपणांस सूचित करणेत येते की. ग्रामपंचायतीचे अधिनस्त असणाऱ्या मतदान केंद्राचे किरकोळ दुरुस्ती करणेसाठी ग्रामपंचायत फंडातील निधीचा वापर करणेसाठी याव्दारे आदेशित करणेत येत आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदान केंद्र भेटीदरम्यान सदर कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आलेस संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल. याची नोंद घ्यावी. असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.