शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याहस्ते ११ लाखांच्या धनादेशासह चषक, प्रशस्तीपत्र देऊन शाळेचा गौरव
लांजा:-मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा – २ मध्ये लांजा नं.५ या शाळेने कोल्हापूर विभाग स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर मान्यवरांचे हस्ते ११ लाख रुपयांच्या धनादेशासह चषक, प्रशस्तीपत्र देऊन शाळेचा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा – २ चा गौरव पुरस्कार समारंभ १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण प्रधान सचिव श्रीमती कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय व विभागस्तरावर उत्तुंग यश मिळवलेल्या महाराष्ट्रातील ६६ शाळांचा सन्मान करण्यात आला. यातील कोल्हापूर विभाग (सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी) या पाच जिल्ह्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं.५ या शाळेने तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शिक्षण प्रधान सचिव श्रीम.कुंदन व शिक्षण आयुक्त मांढरे यांच्या हस्ते शाळेला चषक, प्रशस्तीपत्र व ११ लाखाचा चेक देऊन गौरवण्यात आले.
गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा १ मध्ये लांजा नं.५ शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून ३ लाखाचे बक्षीस मिळवले होते. तर यावर्षीही मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा – २ मध्ये कोल्हापूर विभाग स्तरावर तृतीय क्रमांक मिळवून शाळेने सुवर्ण कामगिरी करून कोकणचे नाव कोल्हापूर विभागात उज्ज्वल केले आहे.
कोल्हापूर विभाग स्तरावर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल रत्नागिरी मुख्यकार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.कासार, उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिरभाते, विस्तार अधिकारी श्री.कडव, विस्तार अधिकारी श्री.सोपनूर, डाएटचे अधिव्याख्याता श्री.लट्टे, लांजा गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी श्रीम.हिरवे, केंद्रप्रमुख चंद्रकांत पावसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सर्व पालकवर्ग व लांजा तालुक्यातील शिक्षणप्रेमी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन केले असून तालुक्यातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.