लांजा:-वाचनालये वाचकांवर सुसंस्कार करतात त्यामुळे वाचनालयाकडे पावलं वळली पाहिजेत असे प्रतिपादन लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे सर यांनी केले. लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेच्यावतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनी ते बोलत होते.
लोकमान्य वाचनालय लांजा येथे डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुरुवातीला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रतिमापूजन वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष विजय बेर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.अभिजीत जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर, संचालक विजय हटकर, सल्लागार प्रमोद शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
बेर्डे यांनी पुढे बोलताना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे बालपण त्यांचे कार्य, ते घडले कसे त्यांची बालपणातील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे किस्से सांगून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व त्यांनी विशद केले.
दरम्यान, यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेचे वाचक सभासदांमध्ये सन २०२३-२४ सालात जास्तीत जास्त पुस्तके वाचन करणाऱ्या सभासदांमध्ये बालवाचक कु.जिर्या मंगेश लांजेकर, महिला सभासद सौ.ज्योती सुरेश दीक्षित तर पुरुष सभासदांमध्ये दत्तात्रय ताटके यांचा आदर्श वाचक म्हणून प्रशस्तीपत्र, ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच विजयालक्ष्मी देवगोजी यांनी पदवी संपादन केली तर कार्यवाह उमेश केसरकर यांना जिल्हा परिषद रत्नागिरीचा सन २०२४ सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तसेच वाचनालयाचे संचालक विजय हटकर सर यांना जागतिक पर्यटनमित्र पुरस्कार मिळाला. या सर्वांचे वाचनालयाच्यावतीने ग्रंथ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र लांजेकर यांनी केले तर आभार ॲड.अभिजीत जेधे यांनी मानले. या कार्यक्रमाला वाचनालयाचे संचालक, कर्मचारीवृंद, वाचक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.